दूरध्वनी - ०२२-२४९२१८२७
तेली सेवा समाज, मुंबई (स्थापना :१९४९)
(धर्मादाय आयुक्त नोंदणी क्र. ए -१२०३ (मुंबई) दि .२९/४/१९५३)
अध्यक्षांचा संदेश

संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी झगडत होता.लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर म.गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा उभारला जात होता तर स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे सहकारी तसेच थोर सेनानी सुभाष बाबु देशाला रक्तरंजित क्रांती शिवाय स्वतंत्र मिळू शकत नाही, यासाठी तरुणांना देश स्वतंत्र करण्यासाठी प्रेरित करीत होते. जुन्या हस्तलिखित कागद पत्रावरून असे समजते की, १८८९ साली इमामवाडा भेंडीबाजार येथील कै.कानोबा गुणाजी तळावडेकर यांनी इतर तेली बांधवांना सोबत घेऊन “तेली निराक्षेत फंड” स्थापन केला होता.

त्यानंतर १९१६ साली कै.पुंडलिक कानोबा तळावडेकर यांनी इतर तेली बांधवांना सोबत घेऊन “तेली ज्ञानोत्त्जक फंड” सुरू करून अनेक विदयार्थांचा शैक्षणिक मदत करून समाज संघटीत केला होता. त्याचं काळात तेली समाजातील मुंबई वासीय एकत्र येऊन संत शिरोमणी संत तुकाराम महाराजांचे परम शिष्य श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी मार्गशीष कृ.१३ दि.१७ डिसेंबर १९२८ पासून मुंबईतील विविध भागांत समा‌‌‍ज संघटीत करण्याच्या दृष्टीने साजरी करीत असत. पारतंत्र्यात असल्यामुळे संस्थेला स्थिर असे कार्यालय नव्हते व वाहतुकीची साधने कमी होती. लोक पायी प्रवास करीत. त्या परिस्थितीत समाज संघटीत होऊन स्वातंत्र मिळविणे हे ध्येय प्रत्येक भारतीय बाळगीत असत.१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र्य झाला.

प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वतंत्र्य लढ्याचा जोश ठासून भरला होता,त्यातून सुराज्य निर्मिती व्हावी,समृद्ध राष्ट्र निर्माण व्हावे यासाठी त्याकाळात अनेक सामाजिक, सांकृतिक मंडळाची स्थापना मुंबईतील लोअर परेल,वरळी, भायखळा, गिरगाव, इमामवाडा, कामाठीपुरा, आग्रीपाडा, सातरस्ता, दादर, नायगाव, शिवडी इत्यादी परिसरातील समाजबांधव एकत्र येऊन दि.५ डिसेंबर १९४९ साली “तेली सेवा समाज,मुंबई” या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. संस्थेचा मुख्य उद्देशच मुळी आपआपसा स्नेह वाढविणे समाज संघटीत करून समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक सामाजिक स्तर उंचावणे, आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने समाजातील विविध स्तरांतील २८९ सभासदांनी एकत्र येऊन समाज कार्याला सुरुवात केली. “तेली सेवा समाज,मुंबई,” संस्थेने प्रथम नेतृत्व करण्याचा सन्मान मा. श्रीमान यशवंत सखाराम करंजीकर यांना मिळाला, त्यांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. उपाध्यक्ष मा.गोपीनाथ आरोलकर, चिटणीस मा. राजाराम वाडेकर, खजिनदार भगवान सखाराम साळसकर यांनी कारभार पाहिला. या पैकी एक मा.दत्ताराम वाडेकर यांनी तर विवाह सुद्धा न करता आपला देह समाजाच्या उन्नतीसाठी शेवटपर्यंत झिजवला व शेवटचा श्वास समाजाच्या वास्तूतच घेतला.

संस्थेच्या माध्यमातून व्यायामशाळा,बँड पथक-कवायत.तसेच समाज प्रबोधन व्हावे म्हणून “सेवक” हे मासिक प्रकाशित करण्यात येत असे.सुरवातीचे संस्थेचे कार्यालय खिमजी नागजी चाळ नं.६ रुम नं ३६ एका छोटयाशा १०x १२ च्या खोलीत होते.कालांतराने ते सध्याच्या शंकरराव नराम पथ (मोरारजी मिल नं.२ च्या मागे म्हणजेच आताचे पेनीनसुला पार्कच्या मागे) येथे समाजाचे एक छोटेखानी सभागृह बांधण्यात आले आहे. याच कार्यालयाच्या माध्यमातुन समाजातील विदयार्थांचा, गुणवंताचा, उच्च शिक्षितांचा पदवी धरांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले जाऊ लागले. बँडपथक, कवायत पथकाचे चित्त थरारक मनोरे दिल्लीपर्यंत पोहचले. याची दखल घेत देशाचे उपप्रंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार मा.यशवंतराव चव्हाण तसेच योजना आयोगाचे माजी अध्यक्ष थोर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते मा.मोहन धारिया यांनी सुद्धा आपल्या संस्थेस भेट दिली व संस्थेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले.

माजी अध्यक्ष मा.नामदेव विठ्ठल कांदळगांवकर यांनी अनेक वर्षे संस्थेचे नेतृत्व केले.या काळात त्यांनी लोकसभा,विधानसभा,विधानपरिषदेवर खासदार व आमदार म्हणून निवडून आलेल्या तेली ज्ञाती बांधवांना आपल्या संस्थेच्या कार्यालयात आमंत्रित करून त्यांना संस्थेचा परिचय करून दिला आहे. व सन्मानित करून सत्कार केला आहे. यात प्रामुख्याने खासदार मा.शांताराम पोटदुखे, मा.जयदत्त क्षीरसागर, खासदार श्रीमती केशरताई क्षीरसागर, मा.दत्ताजीराव खानविलकर (मा.मंत्री) मा.पी.के.सावंत, मा.सरदेसाई, मा.दादा भागवत, सन्मा.दीनबंधू साहू (मंत्री ओरीसा राज्य) मा.आमदार संभाजी राव रावपुरे, मा.वि.गो.प्रकाश, मा.ह.सा.हटवार, मा.पार्वती परिहार, मा.डॉ.लक्ष्मिनारायण परिहार, मा.आमदार रामभाऊ पाटील, महाराष्ट्राचे कृषिमंत्री श्री.बाळासाहेब सावंत मा.दत्ताजी नलावडे, आमदार सुरेश देवतळे, मा. खासदार अरविंद सावंत, मा. सुनील शिंदे (आमदार) यांनी देखील संस्थेस भेट दिली आहे.व त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सध्या मुंबई महापालिकेत १३ नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचा देखील सत्कार करून ही परंपरा आज देखील कायम ठेवण्यात आली आहे.

समाजात सामाजिक कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाची दाखल घेतली जाते. त्याचा आपण “ज्येष्ठ समाज सेवक” म्हणून सन्मान करतो.आता पर्यंत अनेक मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

समाजातील विदयार्थांचा गुणगौरव व सत्कार प्रतिवर्षी केला जातो.यासाठी “शैक्षणिक निधी” सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत असंख्य मान्यवरांनी या निधीत मदत दिली आहे. त्यांचाही आपण सन्मान केला आहे. शिक्षण निधीस भरगोस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

समाजातील बहुसंख्य वर्ग हा गिरणी कामगार होता.१९६५-६६ च्या दरम्यान समाज बांधवांना आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी आपली स्वतःची पतपेढी असावी असा विचार पुढे आला राज्यात सहकाराचे पर्व मोठया प्रमाणात सुरू असताना आपणही आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी उपयोग करून घेण्याचे त्या वेळेचा कार्यकर्त्यांनी ठरविले.

१ जानेवारी १९६६ रोजी एकत्र येऊन “श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी” मुंबई ची मुहूर्तमेढ रोवली.२६ जानेवारी १९६६ रोजी १५५ भागधारकांचे रुपये ३०५२ जमा करून संस्था नोंदणी साठी अर्ज केला. समाजातील मान्यवर कार्यकर्ते नाना सखाराम कुणकेश्वरकर (चव्हाण) यांच्या अध्यक्षतेखाली दि.३१ मार्च १९६६ रोजी रामनवमी च्या शुभ दिवशी महाराष्ट्र हायस्कूल,ना.म.जोशी मार्ग (डिलाईड रोड)मुंबई ४०००१३ येथे सह निबंधकाच्या उपस्थितीत संस्थेचे पहिले संचालक मंडळ निवडले गेले.यात अध्यक्ष नामदेव कांदळगांवकर,उपाध्यक्ष मुकुंद सखाराम कामतेकर, चिटणीस स.ना.रसाळ,सहचिटणीस दत्ताराम रा.राणे, वसंत कुरळकर, शांताराम किंजवडेकर, अर्जुन भा.मटकर, धोंडू अर्जुन तळावडेकर, यशवंत स.पावसकर, रघुनाथ गो.राणे, अंकुश सि.साळसकर यांचा सहभाग होता. त्या काळात संस्थेच्या महत्त्वपूर्ण वाटचालीत पांडुरंग महादेव रहाटे, श्रीमती. जयश्री नामदेव कांदळगांवकर, मधुकर गणपत तळावडेकर, केशव गोविंद होळकर, आत्माराम शंकर डिचोलकर, गंगाराम घारू रसाळ, अनंत बापू दाभोळकर, रामचंद्र वेंगुर्लेकर, महादेव विष्णू कोंडुरकर, सदाशिव सिताराम कुरळकर, दत्ताराम वाडेकर, चंद्रकांत साटविलकर, अंकुश साळसकर, शेबा शेलार आदी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन संस्थेची सुरूवातीची जोपासना केली. सन १९७८-७९ दरम्यान पतपेढीचे कार्यालय ६/३६,खिमजी नागजी चाळ,सेनापती बापट मार्ग,लोअर परेल येथून सध्याच्या तेली समाज कार्यालय,शंकरराव नराम पथ (हनुमान गल्ली) येथे स्थलांतरित झाले.सध्या संस्थेच्या स्वमालकीच्या जोगेश्वरी व मालाड येथे जागा आहेत.लवकरच मालाड शाखा सुरू होईल. संस्थेची पहिली शाखा जोगेश्वरी येथे चंद्रकांत नारायण साटविलकर यांच्या अध्यक्षतेच्या कारकिर्दीत सुरु झाली.दुसरी शाखा सध्याचे अध्यक्ष दिलीप दशरथ केळंबेकर यांच्या अध्यक्षतेच्या कारकिर्दीत घेण्यात आली. भविष्यात भांडूप येथे शाखा सुरू करण्याचा मनोदय आहे. मुंबईत अनेक शाखांचे जाळे उभारणे व लवकरच कोकणात ,ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे शाखांचे विस्तार करण्याचा मनोदय आहे.

पतपेढीमध्ये माझा प्रवेश श्री.विनायक कुवेसकर व श्री.शिवाजी झगडे यांच्या पुढाकाराने दि. १० जुलै २००६ रोजी झाला. पुढे माझी वर्णी पतपेढीचा उपाध्यक्ष म्हणून झाली. या ठिकाणी माझा व मारुती साळुंखे यांचा प्रवेश अपघाताने झाला. याठिकाणी मी माझे उद्दिष्ट ठरवलेले होते. त्यातील पाहिलं उद्दिष्ट म्हणजे जोगेश्वरीची बंद असलेली शाखा चालू करणे.यासाठी पतपेढीच्या मासिक बैठकीत संमती घेऊन तीन महिने जोगेश्वरीचा भाग समाजाचे पदाधिकारी, पतपेढीचे पदाधिकारी व जोगेश्वरी मधील स्थानिक ज्ञाती बांधव दारोदारी फिरून पिंजून काढला व जागृती निर्माण केली. त्याला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले. श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून अॅड.नाना पवार यांच्या हस्ते शाखा पुनःजीवित करण्यात आली. ती शाखा आजतागायत फायदयामध्ये चालत आहे. श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष श्री.दिलीप केळंबेकर यांच्या कल्पक नेतृत्वाने यात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.त्यांना खजिनदार श्री.किशोर रसाळ यांची मोलाची साथ मिळत आहे.

सध्या पतपेढीची एकूण उलाढाल १७ कोटी ५० लाखांहून अधिक वसूल भाग भांडवल १ कोटी ८८ लाखाहून अधिक गुंतवणूक ६ कोटी ७७ आहे. राखीव निधी ३ कोटी ८१ लाख कर्ज वाटप ८ कोटी 68 लाख असून सभासद संख्या ८००० पर्यंत आहे, ऑडीट वर्ग ‘अ’ असून गेली अनेक वर्षे १३% लाभांश देत आहे.ठेवी १० कोटी ५० लाख हून अधिक आहे. समाजातील प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील १८ वर्षांहून अधिक सज्ञान व्यक्ती सभासद होऊ शकते. कर्ज मर्यादा श्री.दिलीप केळंबेकर यांच्या कार्यकाळात ५० लाखांपर्यंत वाढविली आहे.विविध ठेव योजना सक्षमपणे राबवीत आहे व कर्ज योजनेतून असंख्य लोकांना सहकार्य केले जाते.

१७ डिसेंबर १९२८ साली (मार्गशीर्ष कृ.१३) श्री संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराज यांचे प्रमुख टाळकरी व परमशिष्य संत श्रीसंताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव प्रसंगी “श्रीसंताजी उत्साही मंडळ,मुंबई” या संस्थेची स्थापना झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या राजवटीत मुंबईतील तेली बांधव एकत्र येवून अनेक विभागात तीन दिवसांचा सत्र साजरा करीत असत. भेंडीबाजार (इमामवाडा),आग्रीपाडा, बी.आय.टी.चाळी,सुंदरगल्ली (भायखळा),सातरस्ता,लोअर परेल,वरळी, दादर आदी विविध विभागात उत्सव करीत असत. यानिमित्त समाजबांधव सहकुटुंब मोठया संख्येने सहभागी होत असत. महिलांचे हळदीकुंकू, मुलांचे शैक्षणिक स्पर्धा, खेळ, कुटुंबपरिचय इ. कार्यक्रम प्रामुख्याने होत असत. सध्या संस्थेचे कार्यालय तेली सेवा समाज संस्थेतच असून संस्थेच्या सभागृहात दरवर्षी मार्गशीर्ष कृ. १३ रोजी श्री संताजी महाराज पुण्यतिथी महोत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्त परिसंवाद, मार्गदर्शन, भजन-किर्तन इ. कार्यक्रम मोठया उत्साहात होतात. २०१३ साली संस्थेचे अध्यक्ष श्री.जनार्दन गंगाराम गवाणकर यांनी श्री संतसंताजी जगनाडे महाराज यांच्या पादुका श्रीक्षेत्र सुदुबंरे येथे पुजन करून आणल्या आहेत. त्यांचा प्रतिवर्षी पालखी सोहळा लालबाग ते लोअर परेल असा मोठया उत्साहात साजरा केला जातो. महिला मंडळाच्या माध्यमातून श्रावणोत्सव, मंगळागौर, जिवंतिका पुजन, हळदीकुंकू समारंभ व मुलांसाठी कार्यक्रम संस्था मोठया उत्साहात करते.

“महिला मंडळ” हे फार पूर्वीपासून समाजात कार्यरत आहे हे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते. श्रीमती. जयश्री नामदेव कांदळगावकर, पद्मजा सेठ, उज्ज्वला चव्हाण, इंदिराबाई आडविरेकर, सुमती महाजन, वंदनाताई बंदरकर, सुहासिनी रसाळ, मंगला साळसकर यांचे नेतृत्व सातत्याने लाभले. त्यांच्या पुढाकाराने कार्यक्रम, मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येतात. महिलांचे संघटनात सध्याच्या काळात सौ.रत्ना महाले (नगरसेविका), शिल्पा चिलेकर व सौ. रुपाली चांदोस्कर-अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. वधूवर मेळावे यशस्वीपणे आयोजित करत आहेत. महिलांच्या संघटीत शक्तीचा वापर विधायक कार्यासाठी करून घेत आहोत.

संस्थेच्या माध्यमातून सामाजयोपगी विविध कार्यक्रम सातत्याने राबविले जातात. प्रामुख्याने, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, योग अभ्यास, ज्युडो-कराटे प्रशिक्षण वर्ग, गरजू विदयार्थ्यांना आर्थिक मदत स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत केली जाते. जेणेकरून शिक्षणापासून मुले वंचित राहू नयेत. संस्थेत प्रवचन व सत्संगसारखे कार्यक्रम देखील राबविले जातात.

जातीचे प्रमाणपत्र संस्थेकडून तेली जातीचे प्रमाणपत्र दिले जाते.

संस्थेचे सभागृह समाज बांधवांना व परिसरातील नागरिकांना माफक दरात विविध कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जाते.

वधूवर सुचक मंडळ सदर उपक्रम फार पूर्वीपासून संस्थेत राबविला जातो. या माध्यमातून समाजातील विवाह संस्था भक्कम करणे, तरुण-तरुणींना योग्य साथीदार निवडणे यासाठी मार्गदर्शन केले जाते. या कार्यात यशवंत पावसकर, भाऊ साळुंके, यशवंत नरवणकर, नारायण आयकर, चंद्रकांत साटविलकर, आत्माराम डिचोलकर, भिकाजीपंत रहाटे, गोपाळ झगडे,अर्जुन मटकर, विजय रहाटे, भिकाजीपंत झगडे, सदाशिव दाभोळकर, शिल्पा चिलेकर, दिलीप केळंबेकर, रघुनाथ ओटवणेकर, प्रमोद सातार्डेकर, सुरेखा वालावलकर, सुनिल पावसकर, विनोद कामतेकर, संजय बापार्डेकर इ. मंडळीनी काम पाहिले आहे. अनेकांचे विवाह जमविण्यास सहकार्य केले आहे. सध्या श्री.राजाराम आजविलकर, श्री.किशोर पेडणेकर, विजय नायबागकार सौ.शुभलक्ष्मी डिचवलकर सौ.सुरेखा वालावलकर या कामी सहकार्य करीत आहेत. प्रथमच संस्थेच्या वतीने श्री.विनायक कुवेसकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री. सुदाम रहाटे व समाजसेवक श्री.मनोहर परुळेकर यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय अपंग वधूवर मेळावा सर्व समाजातील अपंग वधूवरांना लग्न जुळवून त्यांचे संसार सुखात व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

भविष्यात वधूवर सूचक मंडळात नेटवर्किंगच्या माध्यमातून माहिती सभासदांना देण्याचा विचार संस्था करीत आहे.

सध्या संस्थेच्या वतीने भांडूप परिसरात एक कार्यालय सुरू केले आहे. त्याच प्रमाणे जोगेश्वरी येथे मजासवाडी येथील पतसंस्थेच्या कार्यालयात देखील समाजाचे कार्य सुरू आहे. या परिसरात संघटना बांधणीसाठी सर्व श्री.भगवान सातार्डेकर, प्रकाश डिचोलकर, कै.वसंत सातार्डेकर, राजाराम आजविलकर, मनोहर गिरकर, किशोर पेडणेकर, महादेव बळगे आणि अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन भांडूप व जोगेश्वरी परिसरात कार्यालय सुरू केले. या कार्यालयाचा उपनगरातील असंख्य समाज बांधव लाभ घेत आहेत.

सन २००९ मध्ये आपल्या संस्थेस ६० वर्षे पूर्ण झाली संस्थेने अॅड.दिनानाथ वालावलकर यांच्या कारकिर्दीत एक मोठा सोहळा रविंद्र नाटयमंदिर प्रभादेवी या ठिकाणी मोठया उत्साहात साजरा केला केला.सदर कार्यक्रमात “समाजदृष्टी” या स्मरणिकाचे प्रकाशन केले. सदर कार्यक्रमास राज्याचे राज्यमंत्री ना.विजय वडेटटी्वार,मुंबईच्या महापौर सौ. श्रद्धा जाधव, समाज सेवक डॉ.परिहार, श्री.रोहिदास लोखंडे, श्री.शशिकांत पाटकर, श्री.भास्कर खुरसुंगे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सुधीर सिन्हा (खानविलकर) यांचा कलाकार ऑकेस्ट्रा सादर केला. नेहमीच मनातील खंत आपण बोलतो की आपले “समाज भवन” नाही तेव्हा सदर कार्यक्रमास राज्यमंत्री मा.विजय वडेटटी्वार यांनी दीड लाख रुपये देणगी जाहीर केली व ती संस्थेस देण्यात आली.

कोकणात समाज भवन उभारण्याचा निर्णयानंतर अनेकवेळा चर्चा करून कोकणातील तालुकावार जिल्हा स्तरावरील विविध संस्थांसमवेत चर्चा करून चिपळूण ते सावंतवाडी पर्यंत अनेकवेळा भेटी देऊन,चर्चा करून,संवाद साधून दौरा आखण्यात आला. या कामी मी पुढाकार घेऊन समाजाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील बंद पडलेले समाज मंडळ पुन्हा कार्यरत करण्याचा प्रयत्न केला व ते यथाअवकाशाने सुरूही ही झाले. दरम्यानच्या काळात अॅड.कृष्णा तेली यांच्या मार्फत श्री.भास्कर शिरवलकर यांची वेताळ बांबार्डे येथे १८ गुंठे जागा घेण्यात आली. अॅड.दिनानाथ वालावलकर (माजी अध्यक्ष) अॅड. विनायक तेली यांनी रितसर कागदपत्रे संस्थेच्या नावे करण्यात बहुमोल सहकार्य केले. यावेळी श्री.प्रकाश डिचोलकर,श्री.महेश पेडणेकर, श्री.संजय बापार्डेकर, श्री.प्रदीप आकेरकर उपस्थित होते. समाजाची हक्काची मालकीची जागा कोकणात घेण्यात संस्थेला आलेले मोठे यश म्हणावे लागेल. सदर जागेत समाज भवन बांधणी उभारण्याचा निश्चय केला गेला.सदर जागेत सध्या विहीर व सभोवार भिंत उभारली व कै.माधव नांदगावकर यांच्या मार्फत आराखडा आकारण्यात आला.त्याचा प्रत्यक्ष भूमी पूजनाचा कार्यक्रम १ जून २०१३ रोजी मा.मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमास कोकणातील प्रत्येक तालुका स्तराचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमास १००० हून अधिक उपस्थिती होती.सदर काम सध्या पूर्णत्वाकडे जात असून लवकरच पूर्ण केले जाईल.या कामासाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान संस्थेपुढे आहे. अनेक दानशूर मंडळींनी देणग्या देऊन सहकार्य करीत आहेत. लवकरच सदर बांधकाम पूर्ण करून मे २०१६ पर्यंत सभागृहाचे लोकार्पण केले जाईल.या वास्तू पूर्ततेसाठी “इमारत निधी” उभारण्यासाठी स्मरणिका काढण्यात येत आहे. त्यास जाहिरात देणगी देऊन ५० लक्ष रुपये यातून निधी उभारण्याचा उद्देश संस्थेने ठेवला आहे. सर्व समाज बांधवानी सहकार्य केल्यास निश्चितच आपण हे पूर्ण करू असा विश्वास वाटतो.

भविष्यात संस्थेच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम कोकणात राबबावेत असा मनोदय आहे. समाजातील पुढील पिढी शैक्षणिक क्षेत्र झेप घेऊन भविष्यात प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटविण्याचा प्रत्नय केला पाहिजे.

तेली सेवा समाजाच्या वतीने माझी अध्यक्ष पदासाठी दुसऱ्यांदा निवड झाली. मला मिळालेल्या या पदांना न्याय देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करीत आहे.या प्रयत्नांत मला तेली सेवा समाज,श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी,श्रीसंताजी उत्साही मंडळ,तेली सेवा समाज महिला आघाडी,श्री.मनोहर परुळेकर, श्री.श्रीकृष्ण तळावडेकर,श्री.सुरेश पडवळकर, अॅड.नाना पवार, श्री.कमलाकर शेलार (ठाणे) भाऊ पावसकर, श्री.अनंत दाभोळकर या सर्वांचे फार मोठे सहकार्य लाभले हे मी माझे परम भाग्य समजतो. कै.माधव नांदगांवकर यांचेही मोठे सहकार्य मिळाले.

यापुढे आपल्याला समाजाच्या विकासाच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी करावयाच्या आहेत.ते म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात ५-१० गुंठे जागा घ्यावयाची आहे.पतपेढीचा कार्यविस्तार वाढवून तिला ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंत घेऊन जावयाचे आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत विकासाची गंगा घेऊन जावयाची आहे.हे शिवधनुष्य पेलणे कठीण आहे याची कल्पना आहे,परंतु हे अशक्य ही नाही.

तेली सेवा समाजाच्या अध्यक्ष या नात्याने मी प्रथम प्राधान्य दिले आहे ते याला कि या वास्तूत तीन संस्था काम करतात व एक महिला आघाडी या सर्वांनी हातात हात घालून एक दिलाने व एक विचाराने काम करून समाजात विश्वास निर्माण केला तर काहीही आवश्यक नाही. याची प्रचिती सांप्रदायिक काळात चाललेल्या कामकाजावरून आपणांस येईल, यातच यशाचे गमक दडलेले आहे.आणि या कामी आपण सर्व समाज बांधव आर्थिक, शारिरीक व सर्व प्रकारचे योग्य दान दयाल हा विश्वास व्यक्त करून माझ्या मनोगतामधून अनवधानाने कोणाचा उल्लेख करावयाचा राहून गेला असल्यास अथवा काही आक्षेपार्ह वाटत असल्यास कोणी दुखावलं गेल असल्यास मी आपली क्षमा मागून मनोगत पूर्ण करतो.

धन्यवाद !!

भगवान (विलास) सखाराम सातार्डेकर.

अध्यक्ष.

तेली सेवा समाज, मुंबई.

गतआठवणी